इचलकरंजी मतदारसंघ ठरणार निर्णायक!

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महत्त्वाचा म्हणून इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाकडे पाहिले जाते. यामध्ये प्रामुख्याने विद्यमान आमदार प्रकाश आवाडे हे भाजप सहयोगी सदस्य आहेत. त्याचबरोबर माजी आमदार सुरेश हाळवणकर हेसुद्धा भारतीय जनता पार्टीचेच आमदार आहेत.

त्यामुळे गेली पंधरा वर्षे इचलकरंजी विधानसभा मतदारसंघावर भारतीय जनता पार्टीचेच वर्चस्व राहिल्याचे दिसून येते. त्यामुळे या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी, परिणामी महायुती सक्षम आहे. भारतीय जनता पार्टीच्या कोट्यातून आ. प्रकाश आवाडे यांनी आपले पुत्र राहुल आवाडे यांच्यासाठी उमेदवारीसाठी प्रयत्न केले; परंतु त्यांना यश आले नाही.

त्यामुळे त्यांना शिवसेना शिंदे गटाच्या वतीने दिलेले उमेदवार धैर्यशील माने यांचाच प्रचार करावा लागणार आहे.मिरज येथील जातीय दंगलीनंतर इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचे समीकरण बदलत गेले. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत सुरेश हाळवणकर हे कमळ चिन्हावर निवडून आले अन् जिल्ह्यामध्ये कधी नव्हे ते कमळ फुलले.

त्यानंतर त्यांनी सलग दोन वेळा आमदारकी भूषवली. 2019 च्या निवडणुकीत आ. प्रकाश आवाडे यांनी काँग्रेसशी फारकत घेत स्वतंत्र अपक्ष ताराराणी पक्षाच्या वतीने निवडणूक लढवली. त्यामध्ये त्यांनी यश मिळवले. त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला. त्यामुळे विद्यमान आमदार व माजी आमदार यांच्या सहयोगाने इचलकरंजी मतदारसंघामध्ये महायुतीची ताकद भक्कम असल्याचे दिसून येत आहे.

इंडिया आघाडीच्या वतीने काँग्रेसचे शशांक बावचकर, राहुल खंजिरे, संजय कांबळे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे मदन कारंडे, अशोक जांभळे यांच्यासह शिवसेनेचे महादेव गौड, सयाजी चव्हाण यांच्याबरोबर इतर लहान-मोठे गट महाविकास आघाडीसोबत आहेत; परंतु उमेदवार ठरत नसल्याने काय हालचाली कराव्यात, या संभ्रमात ते आहेत.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा, माजी खासदार राजू शेट्टी यांची ‘एकला चलो रे’ची भूमिका कायम आहे.

मी आघाडीत येणार नाही; मात्र महाविकास आघाडीने आपल्याला पाठिंबा द्यावा, अशी त्यांची मागणी आहे. पण, अद्याप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भूमिका स्पष्ट केलेली नाही. एक-दोन दिवसांत याबाबतची भूमिका स्पष्ट होईल. त्यामुळे अद्याप तरी सर्वजण चिडीचूप आहेत.