इचलकरंजी-शिरदवाड मार्ग बंद! पूरग्रस्त नागरिक परतू लागले घरी

सध्या पावसाने थोडीफार उघडीप दिली आहे. त्यामुळे पंचगंगा पाणी पातळी संथगतीने कमी होत आहे. पंचगंगा नदीला आलेला पूर संथगतीने ओसरत असला तरी अद्याप कर्नाटक मार्ग सुरू झालेला नाही. अद्याप यशोदा पुलाजवळ पाणी आहे. त्यामुळे कर्नाटक राज्याशी जोडणारा इचलकरंजी – शिरदवाड मार्ग सुरू होण्यास अद्याप तीन दिवसांची प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पूरग्रस्त नागरिक घरी परतू लागले आहेत. सध्या दोन निवारा केंद्र सुरू ठेवले आहेत. त्यामध्ये १२७ कुटुंबातील ५०४ पूरग्रस्त नागरिक आहेत. पण, पुराचे पाणी अत्यंत संथगतीने ओसरत आहे. अद्यापही इशारा पातळीपेक्षा जास्त पुराचे पाणी आहे. काही भागातील पूर ओसरल्यामुळे नागरिक आपापल्या घरी परतत आहेत. त्यामुळे १० निवारा केंद्रांची संख्या आता ८ वर आली आहे. श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात ९० कुटुंबातील ३५५ नागरिक थांबले आहेत, तर मंगलधामधील ३७ कुटुंबातील १४९ नागरिक पूर ओसरण्याच्या प्रतीक्षेत आहेत. सध्या पूराची पातळी संथगतीने कमी होत असल्यामुळे यशोदा पुलाजवळील पाणी कमी होण्यास किमान तीन दिवसांचा कालावधी लागेल, अशी माहिती आपत्ती निवारण विभागाचे संजय कांबळे यांनी दिली.