जी गत हिंगोलीची तीच गत आता हातकणंगल्याची (Hatkanangale Lok Sabha Election) आहे. हातकणंगल्यातून शिवसेनेने धैर्यशील माने यांच्या नावाची घोषणा केली आहे. पण त्यांना भाजपचा आधीपासूनच विरोध होता. हातकणंगल्याची जागा ही भाजपने लढवावी अशी मागणी कार्यकर्त्यांकडून होत होती. त्यातच आता हातकणंगलेमधून इच्छुक असलेले भाजपचे नेते संजय पाटील हे धैर्यशील माने यांच्यावर नाराज आहेत. जोपर्यंत सन्मान नाही तोपर्यंत धैर्यशील मानेंचा प्रचार करणार नाही अशी भूमिका संजय पाटील यांनी घेतली आहे.
धैर्यशील माने यांच्याबद्दल हातकणंगलेमध्ये नकारात्मक वातावरण आहे. त्यामुळे महायुतीचा एक खासदार कमी होऊ शकतो असं सांगत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना मतदारसंघांमधील सर्व कल्पना दिली असल्याचं संजय पाटलांनी सांगितलं. धैर्यशील माने यांचा प्रचार करू नये असा कार्यकर्त्यांचा दबाव असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.