आज वर्षातील शेवटचा दिवस आणि हा दिवस साजरा करण्यासाठी तसेच नववर्षाचे स्वागत करण्यासाठी वस्त्रनगरी इचलकरंजी सज्ज झालेली आहे. या थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशन साठी इचलकरंजी शहरांमधील अनेक बियर बार, हॉटेल्स यांना आकर्षक रोषणाई करण्यात आलेली आहे आणि अनेक मित्रमंडळी शहराबाहेर एखाद्याच्या फार्म हाऊसवर, शेतामध्ये किंवा एखाद्या धाब्यावर पार्टी करून आनंदोत्सव साजरा करीत असतात. तसेच अनेक मंडळी आपल्या घरी तांबडा पांढरा रस्सा बनवून शुद्ध शाकाहारीचा बेत करून सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी तयार राहतात. अनेक कॉलनीमध्ये तसेच अपार्टमेंटमध्ये ग्रुप एकत्र येऊन नववर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक विविध प्रकारचे मनोरंजनात्मक कार्यक्रम घेऊन नववर्षाचा आनंद द्विगुणित करीत असतात.
थर्टी फर्स्ट हा मंगळवारी आल्यामुळे अनेकांची नाराजी झालेली आहे. कारण अनेक घरांमध्ये मंगळवारी मांसाहारी जेवण करत नसल्यामुळे अनेकांनी रविवारी म्हणजेच सुट्टीच्या दिवशीच थर्टी फर्स्ट चा आनंद साजरा केल्याचे दिसून आले. पण हे सर्व म्हणजेच थर्टी फर्स्ट चे सेलिब्रेशन करीत असताना मात्र पोलिसांची यावर करडी नजर असणार आहे. इचलकरंजी शहरांमध्ये अनेक युवावर्ग नववर्षाचे स्वागत करण्यासाठी जल्लोष करीत असतात तसेच अनेक ठिकाणी ओली पार्टीचे आयोजन केले जाते. परंतु या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी इचलकरंजी शहरातील विविध चौकासह मुख्य रस्ता या ठिकाणी पोलिसांची करडी नजर असणार आहे.