हुपरीत मदरसाचे अवैध बांधकाम; नगरपरिषदेची नोटीस

हुपरी येथील सरकार गायरान भूमी गट क्रमांक 844/अ/1 पैकी मालमत्ता क्रमांक 4489 ची मिळकतीवर सुन्नत जमियतच्या बांधकामासंदर्भात हुपरी नगरपरिषदेने बुधवारी पुन्हा नोटीस बजावली. 10 डिसेंबर रोजी या बांधकामाबाबत असणारी मालकी हक्काबाबतची कागदपत्रे, बांधकाम परवाना व इतर अनुषंगिक कागदपत्रे घेऊन हजर राहावे.उपस्थित न राहिल्यास सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात येईल, असे नोटिसीत मुख्याधिकारी अजय नरळे यांनी नमूद केले आहे.

या ठिकाणचे अनधिकृत बांधकाम काढावे, अशी मागणी हिंदू राष्ट्र समन्वय समितीने केली होती. त्यासाठी 23 सप्टेंबरपासून उपोषण व विविध आंदोलने करण्यात आली. नगरपालिका कार्यालयासमोर हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे नितीन काकडे, शिवसेनेचे राजेंद्र पाटील, बजरंग दलाचे प्रशांत साळोखे, प्रताप भोसले हे उपोषणास बसले होते. गावबंद आंदोलनही केले होते. नगरपालिकेने या ठिकाणचे वीज कनेक्शन तोडून येथे जाण्यास मज्जाव केला होता. त्यानंतर मुस्लिम समाजाने याबाबत इचलकरंजी न्यायालयात दावा केला; मात्र तो फेटाळण्यात आल्याचे म्हटले आहे.