शिवसेनेकडून जागावाटपाचा, अदलाबदलीचा विषय कधीच संपल्याचे सांगितले जात होते. काल दिल्लीत ठाकरेंनी काही मुद्द्यांवर चर्चेसाठी तयार असल्याचे संकेत दिले असल्याची माहिती काँग्रेसच्या गोटातून मिळाली.
त्यामुळे उद्या बुधवारी (ता. ३) महाविकास आघाडीची एकत्रित यादी जाहीर करण्यापूर्वी यावर चर्चा होऊ शकते. दरम्यान, आमदार विश्वजित कदम, विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील मुंबईत तळ ठोकून आहेत. महाविकास आघाडीच्या एकूण चर्चांमध्ये सांगलीचा तिढा सोडवण्यासाठी काँग्रेस आग्रही आहे.
शिवसेनेला माघार घ्यायची नसेल तर मैत्रीपूर्ण लढतीसाठी संपूर्ण तयारी असल्याचे प्रदेश आणि राष्ट्रीय नेतृत्वाला पटवून देण्यात आले आहे. त्याचे पडसाद राज्यात अन्यत्र पडायला नकोत, याची काळजी काँग्रेस नेत्यांसह महाविकास आघाडीला आहे, मात्र ‘मेरिट’च्या आधारे जागांवर आग्रह धरला पाहिजे, या मुद्द्यावर काँग्रेसने शिवसेनेची कोंडी केली आहे.
पश्चिम महाराष्ट्रात ‘मशाल’ चिन्ह हवे होते, ते हातकणंगलेत देत आहात, मग सांगलीचा आग्रह कशासाठी, असा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेला आणला गेला आहे.