कोल्हापूर: ॲम्ब्युलन्समधून डॉक्टर निघाले गरबा खेळायला, सायरन वाजवत वेगाने जाताना वाहनांना धडक

गरबा खेळण्यासाठी चक्क ॲम्ब्युलन्सचा वापर केला गेल्याचं समोर आलं आहे. कोल्हापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील हा धक्कादायक प्रकार आहे. वैद्यकीय महाविद्यातील शिकाऊ महिला डॉक्टर्सने गरबा खेळायला जाण्यासाठी अॅम्ब्युलन्सचा वापर केला.

या सर्व महिला डॉक्टर कोल्हापूरातल्या हॉकी स्टेडिअममध्ये रविवारी रात्री गरबा खेळण्यासाठी जात होत्या. तिथे लवकर पोहोचण्यासाठी त्यांनी ॲम्ब्युलन्सचा वापर केला. धक्कादायक म्हणजे वाहतूकीचा अडथळा येऊ नये यासाठी ॲम्ब्युलन्स जोरजोरात सायरन वाजत रस्त्याने निघाली. ॲम्ब्युलन्समध्ये जवळपास पंधरा ते 20 शिकाऊ महिला डॉक्टर होत्या. 

पण वेगाने जात असताना ॲम्ब्युलन्सने रस्त्यातील दोन वाहनांना धडक दिली. त्यानंतर ॲम्ब्युलन्स थांबवण्यात आली आणि तपासणी  केली असता हा सर्व प्रकार उघडकीस आला. सुरुवातीला लोकांना ॲम्ब्युलन्समध्ये पेँशट असून त्याला वेळेवर रुग्णालयात पोहोचवण्यासाठी ॲम्ब्युलन्स वेगात जात असल्याचं वाटलं.

पण वाहनांना धडक दिल्यानंतर ॲम्ब्युलन्स थांबवण्यात आली. दरवाजा उघडला असता ॲम्ब्युलन्समध्ये पेंशट नाही तर  कोल्हापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शिकाऊ महिला डॉक्टर असल्याचं आढळलं. त्यांच्याकडे चौकशी केली असता. या सर्व मुली हॉकी स्टेडिअमवर गरबा खेळण्यासाठी जात असल्याची माहिती मिळाली.