खरी राष्ट्रवादी कोण? सुनावणीआधी शरद पवारांचं विधान

 मुंबईत आज समाधान आणि आनंद साजरा करण्याचा दिवस आहे. कारण भारत-पाकिस्तान या झालेल्या क्रिकेट मॅचमध्ये विजय मिळवला त्यामध्ये मुंबईच्या खेळाडूंचे योगदान मोठे असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधकांसह अजित पवार गटावर जोरदार निशाणा साधला. मुंबईत झालेल्या सभेत शरद पवार यांनी केंद्र सरकारसह राज्य सरकारवरजोरजार हल्लाबोल केला.

खरी राष्ट्रवादी आमच्याकडे

राष्ट्रवादी काँग्रेसमधून उपमुख्यमंत्री अजित पवार गटाने वेगळी चूल मांडत आमच्याकडे आहे तिच खरी राष्ट्रवादी असल्याचे सांगितले जात आहे. मात्र आजच्या झालेल्या सभेत शरद पवार यांनी मात्र आज पुन्हा एकदा त्याच मुद्यावरून अजित पवार गटावर जोरदार हल्लाबोल केला.

सामान्य माणसांच्या मनात…

यावेळी त्यांनी सांगितले की, राष्ट्रवादीतील एका गटाने राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टात राष्ट्रवादीला दोन्ही पातळीवर संघर्ष करायला लावला आहे. मात्र मला खात्री आहे, सामान्य माणसांच्या मनात असलेली राष्ट्रवादी कोणती हे सांगितले जाईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

भाजप आहे कुठं?

आज देशातील राजकीय परिस्थिती वेगळी आहे, कारण कोणी कितीही काही म्हटले तरी संबंध देशात आता भाजपविरोधात एक चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात भाजपसोबत जाण्यास लोकं तयार नाहीत असा जोरदार विश्वासही त्यांनी यावेळी बोलून दाखवला. आज देशात भाजप आहे कुठे असा सवाल करत तामीळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, दक्षिण भारतातून भाजप हद्दपार झाले आहे. त्यामुळे आता लोकांच्या मनातून भाजप गेले आहे असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला आहे.

संघर्षाचा काळ

राष्ट्रवादी काँग्रेसला आजच्या काळात संघर्ष करावा लागत असला तरी लोकांना खरी राष्ट्रवादी कोणती हे माहिती आहे असा विश्वास बोलून दाखवत त्यांनी अजित पवार गटावर निशाणास साधला आहे. शरद पवार यांच्या या विधानामुळे आता राजकीय चर्चेंना ऊत आला आहे.