कोल्हापुरात ऊसाच्या मुद्द्यावरून तुफान राडा झाला आहे. राजाराम कारखान्याच्या एमडीला सतेज पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी चोप दिला आहे. आज सकाळीच ऊस कारखान्याला घेऊन जात नसल्याने सतेज पाटील यांनी मोर्चा काढला होता, त्यानंतर रात्री कसबा बावड्यात कारखान्याच्या एमडीला चोप देण्यात आला, त्यामुळे महाडिक आणि सतेज पाटील गटाचा वाद चिघळला आहे.
राजाराम कारखान्याच्या निमित्ताने सतेज पाटील आणि महाडिक पुन्हा आमने सामने आले आहेत.आपल्या कार्यकर्त्यांचा ऊस न घेऊन सभासदत्व रद्द करण्याचा महाडिक यांचा प्रयत्न असल्याचा आरोप सतेज पाटलांनी केलाय तर अमल महाडिक यांनी सतेज पाटील विनाकारण कारखान्याची बदनामी करत असल्याचा पलटवार केला.
राजाराम कारखान्यात महाडिक यांच्या विरोधात पॅनल उभे करूनही सतेज पाटलांना यश आले नाही, मात्र या निवडणुकीत ज्यांनी सतेज पाटलांना मदत केली त्यांना मात्र या राजकारणाचा आता चांगलाच फटका बसत आहे. त्यांचे ऊसच कारखाना घेऊन जात नसल्याने त्यांचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप सतेज पाटलानी केलाय.
साखर सहसंचालक यांनीच यात आता लक्ष घालण्याची मागणी करत त्यांनी आज सभासदांना घेऊन साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढला. लढा नेत्यांचा आणि फटका कार्यकर्त्यांना बसत असल्याने सतेज पाटील यांनी स्वतः या मोर्चाचे नेतृत्व करत साखर सहसंचालक कार्यालयावर धडक दिली. आठ दिवसात यावर तोडगा निघाला नाही, तर राजाराम कारखान्यावर धडक देण्याचा इशारा सतेज पाटलांनी दिला आहे.सतेज पाटील यांच्या या मोर्चावर महाडिक यांनीही टीका केली आहे.
कारखान्याचे अध्यक्ष आणि माजी आमदार अमल महाडिक यांनी या प्रकरणी सतेज पाटील यांचे आरोप फेटाळून लावत पलटवार केलाय. आज कारखान्याची सुनावणी सुरू असताना मोर्चा घेऊन येऊन त्यांनी अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याची टीका महाडिक यांनी केली. कारखान्याची बदनामी करण्याच्या हेतूने त्यांनी मोर्चा काढला असून मोर्चात सभासद कमी आणि कार्यकर्तेच जास्त असल्याचा आरोपही अमल महाडिक यांनी केला.