येथील कृष्णाघाट रोडवर नवे मिरज कॉर्ड लाईन रेल्वे स्टेशन उभारण्यात येणार आहे.त्यामुळे मिरज जंक्शनवरील गाड्यांचा अतिरिक्त ताण कमी होणार असून तिरुपती, धनबाद, नागपूरसह सोलापूर आणि दक्षिणेत जाणाऱ्या गाड्यांचा तीस मिनिटे वेळ वाचणार आहे. शिवाय मालवाहतुकीसही गती मिळणार आहे.पुणे विभागातीलदौंड कॉर्डलाईनसारखेच मिरजेतही रेल्वे स्टेशन उभारण्यात येणार असून, त्यासाठी जागेची पाहणी आणि सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.
कोल्हापूर, बेळगाव आणि सोलापूर हे तीन रेल्वे मार्ग जोडण्यासाठी कृष्णाघाट रोडची जागा निवडण्यात आली आहे. येथून सहजरीत्या बेळगाव, सोलापूर आणि कोल्हापूर हे तीन रेल्वे मार्ग मिरज कॉर्ड लाईन स्टेशनला जोडले जोणार आहेत.
सध्या मिरजेतून प्रवासी आणि माल वाहतूक करणाऱ्या ६४ गाड्या धावतात. यामधील कोल्हापूर-तिरुपती, कोल्हापूर-धनबाद, कोल्हापूर-नागपूर आणि कोल्हापूर-कलबुर्गी गाड्यांना मिरज जंक्शनमध्ये (Miraj Junction) येऊन इंजिनची अदलाबदल करूनच पुढे जावे लागते. यामध्ये प्रत्येक गाड्यांचा किमान १५ ते ३० मिनिटे वेळ जातो. या कॉर्ड लाईन स्टेशनमुळे या वेळेत बचत होणार आहे. तसेच सोलापूर, बेळगावहून येणाऱ्या मालगाड्यांना कोल्हापूर अथवा सोलापूर, बेळगावकडे मार्गस्थ करायचे झाल्यास पुन्हा मिरज जंक्शनमध्ये इंजिनची अदलाबदल करावी लागते. तीही समस्या यामुळे सुटणार आहे.