सांगलीत मैत्रीपूर्ण लढत की ……

महाविकास आघाडीत जागावाटपाचा तिढा सुटत नसल्याने भिवंडी लोकसभा मतदारसंघ आणि सांगली लोकसभा मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत होणार असून, हाच अखेरचा मार्ग असल्याचं वक्तव्य भिवंडीचे पक्ष प्रभारी व वरिष्ठ काँग्रेस नेते अनिस अहमद यांनी केले आहेत. विशेष म्हणजे भिवंडी, सांगलीत मैत्रीपूर्ण लढत करण्याबाबत काँग्रेसनं पक्षश्रेष्ठींना तसा प्रस्ताव देखील पाठवला असल्याचं अनिस अहमद म्हणाले आहेत.

त्यामुळे असे झाल्यास महाविकास आघाडीला आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का असणार असल्याची चर्चा आहे. महाविकास आघाडीत सांगली लोकसभा मतदारसंघ सध्या जागावाटपाच्या वादाचा केंद्रबिंदू बनला आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने सांगलीमधून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर करून टाकली आहे. दुसरीकडे काँग्रेसकडून विशाल पाटील इच्छुक असून, त्यांच्या उमेदवारीसाठी विश्वजित कदम प्रचंड आग्रही आहे. त्यामुळे सांगलीचा तिढा सुटता सुटत नसल्याचे चित्र आहे.

अशात विश्वजित कदम यांनी थेट दिल्ली गाठत पक्षश्रेष्ठींची भेट घेऊन आपली भूमिका मांडली आहे. कोणत्याही परिस्थितीत सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला सुटला पाहिजे अशी भूमिका कदम यांनी घेतली आहे, तर काहीही झालं तरी सांगलीची जागा शिवसेना ठाकरे गटाकडून लढवली जाणार असल्याची भूमिका संजय राऊत यांनी घेतली आहे.सांगलीच्या जागेवर दावा करणारे विश्वजित कदम थोड्या वेळात नाना पटोले यांची भेट घेत आहे.

त्यामुळे सांगलीच्या जागेवर काँग्रेसचा दावा कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. कार्यकर्त्यांचा विश्वजित कदम यांच्यावर प्रचंड दबाव असून, सांगलीची जागा काँग्रेसने सोडून नयेत अशी त्यांची भूमिका आहे. त्यामुळे आता नाना पटोले यांच्या बैठकीत नेमकी काय चर्चा होते हे पाहणे महत्वाचे असणार आहे.