रक्षाबंधनच्या दिवशी सुप्रिया सुळेंचं ‘लाडकी बहीण’वर भाष्य…

आज रक्षाबंधन… बहिण- भावाच्या प्रेमाचा दिवस… आज बहिणी भावांना राखी बांधतात आणि भाऊ बहिणीला तिच्या रक्षणाचं वचन देतो. आजचा हा खास दिवस बहिण- भाऊ भेटून, कुटुंबासोबत एकत्र साजरा करतात. राज्याच्या राजकारणातील बहिण भावाची जोडी म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे… अजित पवार सध्या महायुतीत आहेत. तर सुप्रिया सुळे या महाविकास आघाडीत आहेत. अशात सध्याची राजकीय परिस्थिती पाहता हे बहिण- भाऊ रक्षाबंधन साजरं करणार का? याची महाराष्ट्रभर चर्चा होत आहे.

अजित पवार यांची जनसन्मान यात्रा सध्या सुरु आहे. आज या यात्रेनिमित्त अजित पवार मुंबईत आहेत. तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांचाही दौरा सुरु आहे. सुप्रिया सुळे आज नाशकात आहेत. अशात सुप्रिया सुळे यांच्याकडून राखी बांधून घेणार का? असा प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आला. तेव्हा मी आज मुंबईत आहे. त्यामुळे इथे ज्या- ज्या बहिणी असणार आहेत त्यांच्याकडून मी राखी बांधून घेणार आहे, असं अजित पवार म्हणाले. तर अतिथी देवो भव: असे माझ्यावर संस्कार आहेत.

पवार आणि सुळे कुटुंबाने माझ्यावर हे संस्कार केलेत. त्यामुळे जर नाशकात कुणी आलं तर मी नक्की राखी बांधेन, असं त्या म्हणाल्यात. त्यामुळे आज रक्षाबंधनला सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांची भेट होते का? हे पाहावं लागेल. महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक पुढे ढकलली आहे. यावर सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं. तुम्ही निवडणुका पुढे ढकलू शकता पण निकाल बदलू शकत नाही. हा रडीचा डाव आहे. जर लाडकी बहिण योजनेशिवाय जर हे पास होत नसतील. तर यातच यांचं अपयश आलं, असं त्या म्हणाल्या.