कोल्हापूरचे भाजप नेते समरजित घाटगे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय जवळचे मानले जातात. सध्या ते बरेच चर्चेत आले आहेत, मात्र त्यामागचं कारण थोडं वेगळ आहे. समरजित घाटगे यांच्या पत्नी नवोदिता घाटगे यांच्यासोबत फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. नवोदिता यांची ऑनलाइन फसवणूक झाली. त्यांना तब्बल 20 लाखांचा फटका बसल्याचं उघडकीस आल्याने खळबळ माजली.
मात्र या प्रकरणावरून हसन मुश्रीफ गटाने घाटगे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केल्यानंतर आता नवोदिता घाटगे यांनी आपलं मौन सोडलं आहे. या प्रकरणावरून राजकारण करण्याची गरज नाही. समरजित घाटगे यांचं नाव यात घ्यायचं कारण नाही अशा शब्दांत नवोदिता यांनी विरोधकांना ठणकावलं आहे. पुन्हा कोणाची अशी फसवणूक होऊ नये म्हणून मी रीतसर तक्रार सुद्धा दिली आहे, असे त्यांनी स्पष्ट केलं.
नवोदिता यांची तब्बल 20 लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची माहिती समोर आल्याने एकच खळबळ माजली. या प्रकरणी पोलीस ठाण्यातही तक्रार दाखल करण्यात आली. पण पोलिसांकडून या प्रकरणी अपेक्षित अशी कारवाई करण्यात आली नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यांनी या माध्यमातून घाटगे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.
भाजप नेते समरजित घाटगे यांच्या पत्नी नवोदिता घाटगे यांची काही दिवसापूर्वीच अज्ञातांनी 20 लाख रुपयांची फसवणूक केली. मलेशियाला पाठवलेल्या पार्सलमध्ये एमडी ड्रग्स आणि बनावट पासपोर्ट असल्याची बतावणी करून आयकर आणि सीबीआय अधिकारी असल्याचे सांगत दोघाजणांनी ऑनलाोईन ही फसवणूक केली. दरम्यान या प्रकरणावरून ष्ट्रवादीच्या हसन मुश्रीफ गटाने घाटगे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.