बँकेच्या डिपॉझिट मशीनमध्ये पाच हजारांच्या बनावट नोटा….

इचलकरंजी शहरातील एका सहकारी बँकेच्या डिपॉझिट मशीनमध्ये पुन्हा एकदा बनावट नोटा आढळून आल्या.पाचशे रुपयांच्या एकूण दहा बनावट नोटा असे एकूण पाच हजार रुपये भरल्याप्रकरणी एकावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. लालूप्रसाद अरविंद यादव (रा.इचलकरंजी) असे त्याचे नाव आहे. याबाबतची फिर्याद बँकेचे मुख्य व्यवस्थापक आण्णासो मलगोंडा नेर्ले (वय ५४) यांनी पोलिसांत दिली आहे.

पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, शहरातील एका सहकारी बँकेचे स्टेशन रोडवरील गुरू टॉकीजजवळ कॅश डिपॉझिट मशीन आहे. या ठिकाणी २७ मार्चला दुपारी एक वाजून ५० मिनिटांनी संशयित लालूप्रसाद यादव यांनी खात्यामध्ये ५०० रुपयेच्या १० बनावट नोटा भरल्या. त्यानंतर मशीनमध्ये बँकेला पाच हजार रुपयांच्या बनावट नोटा मिळून आल्या.

याप्रकरणी बँकेने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार यादव यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी संशयिताला अद्याप पोलिसांनी ताब्यात घेतलेले नाही. शहरात मागील वर्षभरात काही बँकांमध्ये सलग बनावट नोटा आढळल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत.