सरकारने आठवा वेतन आयोग स्थापन करण्याचा निर्णय घेतल्यापासून सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक आयोगाच्या स्थापनेची आणि शिफारशींची वाट पाहत आहेत. केंद्र सरकारनेही आठवा वेतन आयोग स्थापनेची प्रक्रिया सुरू केली आहे. संभाव्य फिटमेंट फॅक्टर, पगारवाढ आणि त्यावर आधारित पेन्शन यावर सध्या लोकांमध्ये उत्सुकता आहे. आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर नेमकी किती पगारवाढ मिळणार, हे जाणून घेऊयात.
8व्या वेतन आयोगाला सरकारने जानेवारी 2025 मध्ये मान्यता दिली आहे. त्याची अंमलबजावणीची संभाव्य तारीख 1 जानेवारी 2026 आहे. म्हणजेच, वेतन आणि पेन्शनमधील बदलांचा परिणाम या दिवसापासून दिसून येईल. आठवा वेतन आयोग हा केंद्र सरकारने त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या आणि पेन्शनधारकांच्या वेतन आणि भत्त्यांचा आढावा घेण्यासाठी स्थापन केलेला एक नवीन वेतन पॅनेल आहे. हा आयोग सध्याच्या वेतन रचनेत बदल करण्याची शिफारस करतो जेणेकरून कर्मचारी महागाईला तोंड देऊ शकतील आणि त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करू शकतील.
मागील अनुभव काय?
आठव्या वेतन आयोगाचा फायदा साधारण 50 लाख कर्मचारी आणि 68 लाख पेन्शनधारकांना होणार आहे. मागील अनुभव पाहता, किमान मूळ पगारात चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. उदाहरणार्थ, 7 व्या वेतन आयोगात मूळ पगार 7,००० रुपयांवरून 18,००० रुपये करण्यात आला होता. सरकारने आठवा वेतन आयोगाच्या फिटमेंट फॅक्टरमध्ये 3 किंवा त्याहून अधिक वाढ केली. तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे. आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारात 19,000 रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. आठव्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांचे किमान वेतन 51,480 रुपये असेल. इतकंच नव्हे तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणारी पेन्शनची रक्कमही 27,740 रुपयांपर्यंत वाढू शकते.
आठव्या वेतन आयोगामुळं केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे अच्छे दिन येणार आहे. सातव्या वेतन आयोगाचा कार्यकाळ डिसेंबर 2025 मध्ये संपत आहे. त्यामुळं जानेवारी 2026 पासून आठवा वेतन आयोग लागू करण्यात येण्याची शक्यता आहे.