हातकणंगले माणगाववाडीत पाच हातभट्टींवर छापा!

माळभाग माणगाववाडी ( ता. हातकणंगले) येथे अन्वेषण विभागाला राजरोस पणे बेकायदेशिर रित्या गावटी दारू काढत असलेल्या पाच हात भट्यावर स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाच्या पथकाने रविवारी धाडी टाकून अंदाजे ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पाच जणांच्या विरोधात हातकणंगले पोलीसात गुन्हे दाखल केले आहेत.

सागर सुरेश खोत, संदीप चंद्रकांत खोत, कुमार विलास खोत सर्व रा. माणगाववाडी निरंजन अण्णासो भोसले रा. चंदुर रोहित प्रभाकर माळी रा. खोतवाडी अशी गुन्हे दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. रविवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला माणगाववाडी येथे अवैधरित्या हातभट्टी सुरू असून त्यातून मोठ्या प्रमाणावर गावठी दारू निर्माण केली जात असल्याची माहिती मिळाली त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी आपल्या सहकाऱ्यासह रविवारी धाडी टाकल्या.

त्यात पाच ठिकाणी अवैधरित्या गावठी दारुच्या भट्या सुरू असल्याचे त्यांना निदर्शनास आले. त्यांनी त्याच ठिकाणी त्या नष्ट करून ७५० लिटर कच्चे रसायन ४०० लिटर पक्के रसायन व २०० लिटर गावठी दारू असे एकूण ५७ हजार रुपयेचा मुद्देमाल जप्त केला.