डॉ. अनिकेत देशमुख यांनी घेतली शरद पवारांची भेट!

महाविकास आघाडीकडून माढा लोकसभेच्या उमेदवारीच्या उमेदवारीचा तिढा सुटत नसला तरी भेटीगाठींना मात्र जोर आला आहे. माढ्याच्या उमेदवारीसंदर्भात शरद पवार यांच्याशी प्रथमतः धैर्यशील मोहिते पाटील यांनी भेट घेऊन चर्चा केली.

त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शेकापच्या डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी भेट घेतल्यानंतर आज (ता. ७) रोजी माढा लोकसभा लढण्यासाठी इच्छुक असलेले डॉ. अनिकेत देशमुख यांनी शरद पवार यांची बारामती येथे भेट घेऊन सविस्तर चर्चा केली आहे.भाजपने माढ्यातून विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली. परंतु या उमेदवारीमुळे धैर्यशील मोहिते-पाटील नाराज आहेत. ते कोणत्याही परिस्थितीत माढा लढण्यासाठी इच्छुक आहेत.

धैर्यशील मोहिते-पाटलांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली नसली तरी मोहिते-पाटील कुटुंब माढा मतदारसंघातील गावभेटी करीत कार्यकर्त्यांशी संपर्कात आहे. भाजपमध्येच नाईक निंबाळकर व मोहिते पाटील वाद चव्हाट्यावर आला असताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून ‘तुतारी’कोण हाती घेईल? यासाठी सर्वांचे लक्ष लागले आहे.

धैर्यशील मोहिते-पाटील पक्षांतर करून तुतारी हाती घेणार का? याबाबत अद्यापही स्पष्ट झाले नसल्याने माढ्यासाठी धनगर समाजातील व मागील वेळी सांगोला विधानसभा लढवलेले डॉ. अनिकेत देशमुख इच्छुक आहेत. सध्या मराठा व धनगर समाजाच्या मतांचे गोळाबेरीज करण्यासाठी शरदचंद्र पवार गटाकडून डॉ. अनिकेत देशमुख यांचे पारडे जड वाटू लागले आहे.