दिव्यांग अनुसे यांनी सायकलने प्रवास करत घेतले अयोध्येत श्रीराम दर्शन

आटपाडी तालुक्यातील अनुसेवाडी येथील दिव्यांग गोरख विठ्ठल अनु या तरुणाने १७ दिवस आटपाडी ते अयोध्या असा सायकलवरून प्रवास करीत श्रीरामाचे दर्शन घेतले. दर्शन घेऊन परतलेल्या गोरख अनुसेचे आटपाडीकरांनी उत्साहात स्वागत केले. अनुसेवाडी येथील गोरख अनुसेने १४ मार्चला आटपाडीतून अयोध्येला सायकलीवरून गेले होते. व्यंगावर मात करत अनुसे यांनी श्रद्धा आणि भक्तीतून प्रेरणा घेत सोळाशे किलोमीटर अंतर कापून अठराव्या दिवशी अयोध्या गाठली. दररोज शंभर किलोमीटरचा प्रवास ते करीत होते.

पहाटे सहा ते दहा आणि सायंकाळी चार ते आठ या वेळेत ते प्रवास करीत होते. दुपारी आणि रात्री तो विश्रांती घेत असे. या दीर्घ प्रवासात ते आजारी पडले नाहीत. अयोध्येत त्याने सुरक्षा रक्षकाची भेट घेऊन आपण महाराष्ट्रातून सायकलीवरून श्रीराम दर्शनासाठी आल्याची माहिती दिली. त्यामुळे गोरखला श्रीरामाच्या दर्शनासाठी विशेष वेळ देण्यात आला. अयोध्येत श्रीराम दर्शन घेऊन रेल्वेने ते मिरज येथे आले. परत सायकलवरून गावी परतला. आटपाडी येथे जायंटस ग्रुप, विविध संस्था, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी गोरख उत्स्फूर्तपणे स्वागत केले.