विठुरायाच्या दर्शनासाठी भाविक नेहमीच आतुर असतात. यात आज मराठी नववर्ष व गुढीपाडव्याच्या निमित्ताने पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. पदस्पर्श दर्शन बंद असले तरी देखील मुख दर्शनासाठी भाविक पंढरपुरात आले आहेत. सध्या विठ्ठल मंदिराचे संवर्धन आणि जिर्णोध्दाराचे काम सुरू आहे. त्यामुळे भाविकांना देवाचे पदस्पर्श दर्शन बंद आहे.
तरी ही नवीन मराठी वर्षाची सुरुवात विठ्ठल दर्शनाने व्हावी; या भावनेतुन हजारो भाविक पंढरीत दाखल झाले आहेत. गुढीपाडव्याला शासकीय सुटी असल्याने अनेक भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत. मुख दर्शनाची रांग मंदिरापासून एक किलोमीटर अंतरावर गेली आहे. अजूनही दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा ओघ सुरूच असून भाविकांच्या गर्दीने मंदिर व परिसर फुलून गेला आहे.