उजनी धरणासह इतर साठ्यातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला असून सोलापूर शहरासाठी पिण्याकरिता येत्या दोन-चार दिवसांत उजनी धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे.या काळात भीमा नदीकाठचा वीजपुरवठा बंद करण्यात येणार आहे. त्यावेळी पाणी उपसा करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून विद्युत मोटारी जप्त करण्यात येतील, असा इशारा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पत्रकार परिषदेतून दिला आहे.
सध्या औज बंधाऱ्यात दोन मीटर पाणी असून आज (मंगळवारी) औजमधील पाणी चिंचपूर बंधाऱ्यात घेतले जाणार आहे. त्यावेळी औजमधील पाणीपातळी विचारात घेऊन उजनीतून सोलापूर शहरासाठी भीमा नदीतून पाणी सोडण्यात येणार आहे. यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे.