ताकारी, म्हैसाळ, टेंभू, आरफळ आदी सिंचन योजनांच्या पाण्यावर जिल्ह्यातील शेती फुलली आहेच, शिवाय राजकारण्यांनीही प्रत्येक निवडणुकीत या योजनांचे भांडवल करीत मतांची भरघोस पिके घेतली आहेत.आता सध्याच्या लोकसभा निवडणुकीतही या योजनेचा मुद्दा प्रचारात अग्रस्थानी दिसत आहे. अगदी आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातही याच मुद्द्यावर रान तापलेले दिसणार आहे.
कवठेमहांकाळ, मिरज, जत, तासगाव, खानापूर, विटा, आटपाडी या टंचाईग्रस्त तालुक्यांसाठी सिंचन योजनांचा मोठा आधार आहे. त्यांच्या पाण्यावरच अनेकदा निवडणुकीचे पारडे फिरल्याचा अनुभव आहे. त्यामुळेच डॉ. पतंगराव कदम यांच्यापासून आर. आर. पाटील यांच्यापर्यंत प्रत्येक नेत्यासाठी या योजना जिव्हाळ्याच्या राहिल्या आहेत. अगदी अलीकडे विटा – खानापूरचे आमदार अनिल बाबर यांनीही टेंभू, आरफळसाठी सातत्याने प्रतिष्ठा पणाला लावल्याचे पाहायला मिळाले आहे.