धार्मिक स्थळी कॅमेरे बसवून सुरक्षा वाढवावी

खानापूर येथील श्री महादेव मंदीरातील घटना व कुंडल येथील श्री १००८ गिरी पार्श्वनाथ मंदिरातील घडलेल्या घटनांची पार्श्वभूमी लक्षात घेऊन यासारख्या घटना संदर्भात प्रतिबंधक उपाययोजना म्हणून चिंचणी व पोलीस ठाणे हद्दीतील सर्व गावांमधील मंदीर, मस्जिद, दर्गा, बौध्दविहार यासारख्या धार्मिक स्थळाचे पुजारी, व्यवस्थापक व ट्रस्टी यांची बैठक चिंचणी वांगी पोलीस ठाणे येथे पार पडली.

 यावेळी सहा. पोलीस निरीक्षक राहुल घुगे यांनी सदर बैठकीस मार्गदर्शन केले. ते म्हणाले, एखादी अप्रिय घटना घडून गेल्यानंतर प्रतिबंधक उपाययोजना करण्यापेक्षा घटना घडण्याच्या आधी सर्व धार्मिकस्थळांचे ठिकाणी चांगले प्रतीचे सीसीटीव्ही कॅमेरे लावणे, सर्व धार्मिक स्थळे मजबुत व बंदिस्त करुन घेणे, सुरक्षा रक्षकांची नेमणूक करणे, ज्या धार्मिक स्थळावरती भोंगे लावले जातात त्यांनी सर्व कागदपत्रांची पूतर्ता करुन रितसर परवाना प्राप्त करुन घेणे, धार्मिक स्थळांचे पावित्र्य जपण्यासाठी संबंधितांनी पुढाकार घेणे, सोशल मिडीयाचा वापर काळजीपूर्वक करणे, सोशल मिडीयावरती प्रसारीत होणारे आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित न करणे किंवा त्याबाबत प्रतिक्रिया न देणे, सोशल मिडीयावरील प्रसारित होणारे अफवांवर विश्वास न ठेवणे, त्यावर विश्वास ठेवून वाद विवाद करू नका, अशा सुचना देण्यात आल्या.

तसेच पोलीस खात्यामार्फत राबविले जात असले डायल ११२ चा वापर प्रत्येकवेळी करावा याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी चिंचणी वांगी पोलीस हद्दीतील मंदीर, मस्जिद, दर्गा, बौध्दविहार या धार्मिक स्थळांचे पुजारी, व्यवस्थापक व ट्रस्टी उपस्थित होते.