चेन्नई सुपर किंग्सने आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 29 व्या सामन्यात 20 धावांनी विजय मिळवला आहे. चेन्नई सुपर किंग्सने मुंबईला विजयसाठी 207 धावांचं आव्हान दिलं होतं. मुंबईकडून ओपनर रोहित शर्मा याने अखेरपर्यंत एकाकी झुंज देत जोरदार लढाई दिली. मात्र दुसऱ्या बाजूने रोहितला साथ न मिळाल्याने चेन्नईने मुंबईवर 20 धावांनी विजय मिळवला. एकटा महेंद्रसिंह धोनी मुंबईच्या पराभवाचा कारण ठरला.
धोनीने चेन्नईच्या डावातील 20 व्या ओव्हरमधील शेवटच्या 4 बॉलमध्ये 20 धावा ठोकल्या. मुंबईसाठी याच 20 धावा पराभवासाठी कारणीभूत ठरल्या. मुंबईला 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 186 धावाच करता आल्या.मुंबईकडून रोहित शर्मा याने 63 बॉलमध्ये 5 सिक्स आणि 11 चौकारांसह नाबाद 105 धावांची खेळी केली. तिलक वर्मा याने 31 धावा केल्या. ईशान किशन याने 23 आणि टीम डेव्हिड याने 13 धावांचं योगदान दिलं.
सूर्यकुमार यादव झिरोवर आऊट झाला. तर इतरांनी घोर निराशा केली. रोहितला शतकानंतरही दुसऱ्या बाजूने साथ न मिळाल्याने मुंबईला पराभूत व्हावं लागलं. चेन्नईकडून मथीशा पथीराणा याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर तुषार देशपांडे आणि मुस्तफिजुर रहमान या दोघांनी 1-1 विकेट घेतली.त्याआधी मुंबईचा कॅप्टन हार्दिक पंड्याने टॉस जिंकून चेन्नईला बॅटिंगसाठी भाग पाडलं. शिवम दुबे आणि कॅप्टन ऋतुज गायकवाड या दोघांनी तोडफोड अर्धशतकी खेळी केली.
तर महेंद्रसिंह धोनी याने 20 ओव्हरमधील अखरेच्या 4 बॉलमध्ये 3 सिक्ससह 20 धावा केल्या. त्यामुळे चेन्नईला 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 206 धावा करता आल्या. चेन्नईकडून ऋतुराजने 40 बॉलमध्ये 5 सिक्स आणि 5 फोरसह 69 रन्स केल्या. शिवम दुबे 38 चेंडूत 2 षटकार आणि 10 चौकारांसह नाबाद 66 धावा करुन परतला.रचीन रवींद्र याने 21, महेंद्रसिंह धोनी 20* आणि डॅरेल मिचेल याने 17 धावा केल्या. तर अजिंक्य रहाणे 5 धावावंर बाद झाला. मुंबईकडून हार्दिक पंड्या याने 2 विकेट्स घेतल्या. तर गेराल्ड कोएत्झी आणि श्रेयस गोपाळ या दोघांनी 1-1 विकेट घेतली.