ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत ४-१ अशा विजयानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत दाखल झाला आहे. आफ्रिकेच्या उसळत्या खेळपट्ट्यांवर भारताच्या युवा ब्रिगेडची खडतर कसोटी लागणार आहे.
ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२४ डोळ्यासमोर ठेवताना युवा खेळाडूंना पुन्हा आपली छाप पाडण्याची संधी आहे. पण, आजच्या पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात पावसाने व्यत्यय आणला आणि सामना रद्द करावा लागला.
किंग्समीड येथे आतापर्यंत खेळलेल्या १९ ट्वेंटी-२० सामन्यांत प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने ८, तर लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने ८ सामने जिंकले आहेत.
२००७च्या वर्ल्ड कप स्पर्धेतील भारत- पाकिस्तान सामना टाय झाला होता, तर दोन सामने पावसामुळे रद्द झाले होते. रात्री ८.१० च्या आधी सामना सुरु होईल अशी अपेक्षा होती, परंतु ९ वाजले तरीही तिथे पाऊस सुरू होता. त्यामुळे षटकं कमी होण्यास सुरुवात झाली होती. प्रेक्षक छत्री उघडून उभे होते, तर खेळाडू ड्रेसिंग रुममध्ये मजा करताना दिसले.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मागील ४ ट्वेंटी-२० सामन्यांतील भारताने दोन जिंकल्या आहेत, परंतु अन्य दोन ड्रॉ राहिल्या आहेत. ऑक्टोबर २०१५ मध्ये दक्षिण आफ्रिकेनं ( २-०) भारताविरुद्ध शेवटची ट्वेंटी-२० मालिका जिंकली होती.भारताकडून २०२३ मध्ये ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक २५ विकेट्स अर्शदीप सिंगच्या नावावर आहेत. आयसीसीच्या सर्व सदस्यांमध्ये २०२३ मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांमध्ये अर्शदीप दुसऱ्या क्रमांकावर आहे.