आटपाडी तालुक्यात जुगार अड्ड्यावर छापा……

आटपाडी तालुक्यातील कुरूंदवाडी येथे वगरे वस्तीवरील जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलीसांनी तब्बल २६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी आठ जणांना ताब्यात घेण्यात आले असून अड्डा चालक अर्जुन गवंड आणि काहीजण पळून जाण्यात यशस्वी ठरले. या मोठ्या कारवाईने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत माहिती अशी की, अप्पर पोलीस अधीक्षक यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीसांचे विशेष पथक शनिवारी सायंकाळी कुरुंदवाडीत दाखल झाले. झरे लगतच्या कुरुंदवाडी गावात सांगली आणि सातारा जिल्ह्याच्या सीमेवर वगरे वस्ती आहे.

या वस्तीवर चवरे यांचे जागेतील पत्र्याच्या शेडमध्ये अर्जुन गवंड रा. आटपाडी हा बेकायदेशीरपणे तीन पानी जुगाराचा अड्डा चालवत असल्याची खात्री पथकाने केली आणि तात्काळ छापा टाकला.खेळणाऱ्या व्यक्तींनी पत्त्याची पाने व रोख रक्कम टाकून पळून जाण्याचा प्रयत्न केला.परंतु पोलीसांनी त्यांना पकडले.या कारवाईत मोहन लक्ष्मण खर्जे (वय ४४ रा.विभुतवाडी जि. सांगली), सुरज पांडुरंग घोलप (वय २२ रा. रहिमतपूर जि. सातारा), सचिन काशिनाथ माने (वय ४२ रा. काळचौंडी जि. सातारा), मारुती नागदेव मोटे (वय ४० रा. वरकुटे, जि. सातारा), शंकर मारूती फडतरे (वय ६९ रा. झिरे जि. सातारा), गणेश बाळाराम राठोड (वय ५० वर्षे रा.विभूतवाडी जि. सांगली), उमेश सोपान गुरव (वय ५७ रा. वडझर जि. सातारा), विष्णु रामा माने (वय ६५ रा. झरे जि. सांगली) यांना ताब्यात घेतले.

अंगझडती घेऊन त्यांच्याकडून १ लाख २१ हजार रुपयांची रोकड, पत्त्याची पाने, ५७ हजार ५०० रुपयांचे ११ मोबाईल, १८ लाख ५० हजारांची तीन चारचाकी वाहने, ५ लाख २० हजार रुपयांच्या ९ मोटारसायकल आणि ९७ हजार रुपयांचे अन्य साहित्य असा २६ लाख ४६ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पथकाने ताब्यात घेतलेले ८ आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी आटपाडी पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिला.