आयपीएल 2024 स्पर्धेतील प्लेऑफची शर्यत दिवसागणिक रंगतदार होत चालली आहे. प्रत्येक सामन्यानंतर गुणतालिकेत उलथापालथ पाहायला मिळत आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात आयपीएल स्पर्धेतील 29 वा सामना रंगला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने बाजी मारली. मुंबई इंडियन्सने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर विजय सहज सोपा होईल असं क्रीडाप्रेमींना वाटत होतं. कारण दुसऱ्या डावात पडत असलेलं दव त्यासाठी कारणीभूत धरलं जात होतं.
मात्र चेन्नईने मुंबईच्या बरोबर मुसक्या आवळल्या. मुंबईच्या वानखेडे स्टेडियवर हार्दिक सेनेला पराभवाचं पाणी पाजलं. चेन्नई सुपर किंग्सने 20 षटकात 4 गडी गमवून 206 धावा केल्या होत्या. तसेच विजयासाठी 207 धावांचं लक्ष्य दिलं. मात्र मुंबई इंडियन्सला हे आव्हान गाठता आलं नाही. मुंबई इंडियन्सला 20 षटकात 6 गडी गमवून 186 धावा करता आल्या. महेंद्रसिंह धोनी शेवटच्या षटकात ठोकलेल्या 20 धावा मुंबईला महागात पडल्या. सामन्याच्या निकालानंतर गुणतालिकेत मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे.
मुंबई इंडियन्सचा स्पर्धेतील चौथा पराभव आहे. या पराभवामुळे मुंबईचं प्रचंड नुकसान झालं आहे. मुंबई इंडियन्सची सातव्या स्थानावरून आठव्या स्थानावर घसरण झाली आहे. आता मुंबईचे 8 सामने शिल्लक आहेत. या 8 सामन्यापैकी 6 सामने काहीही करून जिंकावेच लागणार आहे. जर यात काही उलथापालथ झाली तर मात्र प्लेऑफचं स्वप्न भंगणार आहे.
दुसरीकडे, चेन्नई सुपर किंग्सने गुणतालिकेतील आपलं तिसरं स्थान आणखी घट्ट केलं आहे. 8 गुणांसह आता तिसऱ्या स्थानी आहे. मात्र कोलकाता नाईट रायडर्सपेक्षा नेट रनरेट कमी असल्याने तिसऱ्या स्थानावरच समाधान मानावं लागलं आहे. राजस्थान रॉयल्स 10 गुणांसह पहिल्या, कोलकाता नाईट रायडर्स 8 गुण आणि 1.688 नेट रनरेटसह दुसऱ्या, चेन्नई सुपर किंग्स 8 गुण आणि 0.726 नेट रनरेटसह तिसऱ्या स्थानावर आहे.
स्पर्धेतील 30 सामना सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होणार आहे. या सामन्यानंतर बंगळुरुचं प्लेऑफचं गणित काय ते कळणार आहे. बंगळुरुचा पराभव झाला तर मात्र प्लेऑफच्या आशा जवळपास संपुष्टात येतील. तर सनरायझर्स हैदराबादने हा सामना चांगल्या रनरेटने जिंकला तर दुसरं स्थान गाठण्याची संधी आहे. हैदराबादचा संघ सध्या चौथ्या स्थानावर आहे.