कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा निवडणुका सुरुवातीपासून गाजत आहेत. महायुतीच्या उमेदवारीचा घोळ, महाविकास आघाडीच्या पाठिंब्याचा हातकणंगलेतील घोळ, त्यानंतर वादाचे प्रसंग, यातून आता निवडणूक निर्णायक टप्प्यावर आली आहे. थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभा होत आहे. त्यावरून भाजपने तसेच मुख्यमंत्री शिंदे यांनी कोल्हापूरच्या जागा किती प्रतिष्ठेच्या केल्या आहेत, हे लक्षात येते. आपल्या पक्षाचा उमेदवार वा आपल्या पक्षाचे चिन्ह नसतानाही नरेंद्र मोदी यांनी प्रचारसभा घेणे याला राजकीय पातळीवर वेगळे महत्त्व आहे. एका एका जागेसाठी भाजप प्रतिष्ठा पणाला लावत आहे हे तर आहेच; पण मोदी यांची सभा महायुतीच्या भक्कमतेची साक्ष देत आहे.
महाविकास आघाडीचे कोल्हापुरातील उमेदवार शाहू महाराज व हातकणंगलेचे उमेदवार सत्यजित पाटील-सरुडकर यांच्या प्रचारासाठी शरद पवार तसेच उद्धव ठाकरे यांची इचलकरंजी व कोल्हापुरात जाहीर सभा होणार आहे. एकेकाळी जिल्हा परिषदेत प्रतिनिधित्व केलेले माने व सरुडकर यानिमित्ताने समोरासमोर आले आहेत. त्यानंतर दि. 2 व 3 मे रोजी मुख्यमंत्री आपल्या उमेदवारांना ताकद देण्यासाठी कोल्हापुरात मुक्काम करणार आहेत. मुख्यमंत्र्यांचा गाठीभेटीवर जास्त भर असेल. आता या सगळ्याचा फायदा कोणाला होणार, हे निकालानंतर स्पष्ट होईल.