सध्या अनेक भागात पाण्याची टंचाई पहायला मिळत आहे. अनेक गावात पिण्यासाठी तसेच शेतीसाठी पाण्याचा अभाव भासत आहे. अनेक धरणात पाणीसाठा देखील कमी आहे. गतवर्षी सर्वत्रच पाऊसमान फारच कमी झाल्याने विटा शहरासह खानापूर तालुक्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून त्याचा फटका पिण्याच्या पाण्यासह शेती पिकांबरोबरच नवीन इमारतींच्या बांधकामांनाही मोठ्या प्रमाणात बसला आहे.
विटा शहरासह खानापूर तालुक्याला पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्या असून पाण्याअभावी विटा शहरासह परिसरातील अनेक नवीन इमारतींच्या बांधकामांना ‘ब्रेक’ लागला आहे. त्यामुळे बांधकाम व्यवसायातील सर्वच घटक अडचणीत सापडले आहेत. त्याचा सर्वाधिक फटका बांधकाम मजुरांना बसला असून त्यांच्या रोजी-रोटीचा प्रश्न गंभीर झाला आहे. सध्या विटा परिसरात अनेक नवीन इमारतींची बांधकामे सुरू आहेत.
त्यातील काही इमारतींचे काम पूर्णत्वाकडे तर काही इमारतींचे काम अर्ध्यावर आले आहे. परंतु, आता पुढील कामासाठी पाणी नसल्याने ही बांधकामे ठप्प झाली आहेत. विहिरी कोरड्या ठणठणीत पडल्या असून कूपनलिकांनाही पुरेसे पाणी नाही. त्यामुळे इमारतीच्या बांधकामांना पाणी देणे अडचणीचे झाले आहे. पाणी नसल्याने अनेकांना नवीन इमारतींची कामे बंद ठेवण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.
पाण्याअभावी नवीन बांधकामांना ब्रेक लागल्याने बांधकाम मजुरांच्या रोजी- रोटीचा प्रश्न गंभीर बनला आहे. विटा शहराच्या उपनगरातही नवीन इमारतींची मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू होती. परंतु, गेल्या एक महिन्यापासून पाण्याअभावी ही कामे सध्या ठप्प झाली आहेत.
विटा शहरात नगरपरिषदेच्या घोगाव पाणी योजनेच्या पाण्याचेही वेळापत्रक कोलमडले आहे. त्यात नदीपात्रात पाणी टंचाईसह वारंवार होणारा तांत्रिक बिघाडही कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे विटेकरांना पिण्याचे पाणी मिळण्यासही अडचणी निर्माण झाल्या आहेत.