इस्लामपूरात दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा…….

इस्लामपूर आष्टा नाका परिसरातील कुंभार गल्लीत गेल्या महिनाभरापासून नागरिकांना गटारीची दुर्गंधी आणि आळ्या मिश्रित फेसयुक्त पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असल्याने रोगराईचा सामना करावा लागत आहे. पालिकेच्या भोंगळ आणि मनमानी कारभाराविरुद्ध नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. काही नागरिक व लहान मुलांना गॅस्ट्रोसदृश आजाराची लागण झाली आहे. गेल्या महिनाभरापासून परिसरातील नागरिक दूषित पाणीपुरवठ्यामुळे त्रस्त झाले आहेत.

सध्या पालिकेत प्रशासकीय राजवट असल्याने नागरिकांच्या मूलभूत आणि जीवनावश्यक बाबींकडे ही प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. या परिसरातील नागरिकांनी नळाला येणारे पाणी बाटलीमध्ये घेऊन पालिकेतील पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना दाखवूनही त्यामध्ये बदल झालेला नाही. शुक्रवारी या परिसराच्या माजी नगरसेविका कांता उत्तम काजवे, आनंदराव माळी यांनी पालिकेला निवेदन दिले आहे.

पालिकेतील सर्वच विभागाचे अधिकारी नवखे असल्याने त्यांना या शहराची कोणतीही भौगोलिक माहिती झालेली नाही. त्यातच त्यांचा या शहराशी कामापुरते संबंध येत असल्याने त्यांनाही नागरिकांच्या कोणत्याही समस्येबाबत जिव्हाळ्याची भावना असल्याचे दिसून येत नाही. कार्यालयीन वेळेत कामाची पाटी टाकून हात झटकण्याचे प्रकार सर्रासपणे घडत असल्याने नागरिकांच्या जीविताशी खेळ खेळला जात आहे.


आष्टा नाका परिसरातील कुंभार गल्ली, माळी गल्ली येथील रहिवासी गटारीचा दुर्गंधीयुक्त वास येणारे पाणी पित आहेत. त्यात लहान मुलांचाही समावेश आहे. १० मार्च रोजी येथील नागरिकांनी निवेदन देऊन आणि दुर्गंधीयुक्त पाण्याची बाटली भेट देऊन पाइप लाइन दुरूस्तीची मागणी केली होती. मात्र पालिका प्रशासनाने या मागणीला ठेंगा दाखवला आहे. त्यामुळे या परिसरातील लहान मुलांसह वयोवृद्ध नागरिक, महिलांना गॅस्ट्रोसदृश आजाराचा सामना करावा लागत आहे.