ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार!

आटपाडी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील घरामध्ये ओला व सुका कचरा वेगळा करून स्वच्छतेचे महत्त्व कळावे, या उद्देशाला हरताळ फासण्याचे काम आटपाडी तालुक्यातील लेंगरेवाडी ग्रामपंचायतने केले असून, कचरा गोळा करण्यासाठी आणलेल्या कचरापेटीचाच कचरा करण्याचा प्रताप केला आहे.आदर्श गाव असलेले लेंगरेवाडी ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छ भारत मिशन योजनेतून सामाजिक भान जपण्यासाठी व गावातील व वाड्यावस्त्यांवरील घरामध्ये कचरापेटी वाटपासाठी शेकडो पेट्या खरेदी केल्या. त्या कचरापेट्या वाटपाविना एका पडीक शाळेच्या कचरा कोंडाळ्यात पडून आहेत.

शासनाचे लाखो रुपये खर्च करून खरेदी केलेल्या या पेट्या अद्याप का गुलदस्त्यात असून, शासनाचे व ग्रामपंचायतचे लाखो रुपये वाया गेले आहेत. दरम्यान, याबाबत ग्रामसेवक आलम सय्यद म्हणाले की, गेल्या सात ते आठ महिन्यांपूर्वी स्वच्छ मिशन अंतर्गत कचरापेटीची खरेदी केली असून ५०० ते ५२५ पेट्या खरेदी केल्या आहेत. एकूण खर्च अंदाजे एक लाख रुपये केला असून, सर्व कुटुंबाना कचरापेटी वाटप पूर्ण होणार नसल्याने त्या वाटल्या नाहीत. मात्र त्या पेट्या सुस्थितीत ठेवणे गरजेचे होते. मात्र त्या अस्ताव्यस्त फेकल्या आहेत. परिणामी आठ ते नऊ महिन्यांपूर्वी आणलेल्या कचरापेटींचा सध्या कचरा करण्याचा प्रताप ग्रामपंचायतने केला.