हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली येथे आज सकाळी दोन परप्रांतीय तरुणांत वादावादी होऊन झालेल्या मारामारीत एकाचा निर्घृण खून झाला.सुलेमान मनंसरीब (वय २०, मूळ रा.हरिया, ता.फरींदा, जि. महाराजगंज, उत्तर प्रदेश) असे त्याचे नाव आहे. खून करून पळून गेलेल्या अंकितकुमार शिवप्रसाद (मूळ रा. गाव कोनिया, जि. महू, उत्तर प्रदेश) याला हुपरी पोलिसांनी अवघ्या चार तासांत पकडले
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पट्टणकोडोली येथे शिवसेना (ठाकरे गट) उपजिल्हाप्रमुख साताप्पा भवान यांचा मुलगा विकास भवान यांची साईकृपा ट्रेडर्स नावाने कोल्ड्रिंक व्यवसायाची डीलरशिप आहे. गेल्या आठ महिन्यांपासून सुलेमान हा त्यांच्याकडे कामाला होता. सुलेमानसोबत असलेला दुसरा कामगार सोडून गेल्यावर गेल्या आठवड्यात त्यांनी दुसरा कामगार अंकितकुमार याला कामावर घेतले होते, पण काम करताना नेहमीच त्याची तक्रार होती. म्हणून भवान यांनी तू कामाला थांबू नको, निघून जा, असेही सांगितले होते; पण अंकितकुमार काम सोडून गेला नव्हता.
हे दोघेही कामगार कोल्ड्रिंकच्या गोदामामध्येच राहात होते. कालपासून किरकोळ कारणावरून त्यांच्यात वाद झाले होते. विकास यांनी दोघांनाही न भांडण्याच्या सूचना दिल्या होत्या; मात्र सकाळी विकास हे गोदामामध्ये दरवाजा उघडा दिसला म्हणून कामगारांना आवाज देत आत गेले असता सुलेमान रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. विकास यांनी हुपरी पोलिसांना याबाबत तत्काळ कळवले.