हातकणंगले रेल्वे स्थानकामध्ये विविध सोयीसुविधा द्याव्यात; खासदार धैर्यशील माने यांच्याकडे मागणी

हातकणंगले रेल्वे स्टेशनमध्ये विविध सोयीसुविधा देण्यासह हातकणंगले रेल्वे स्टेशनचे हातकणंगले-इचलकरंजी असे नाम विस्तार करावे, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा प्रवासी यात्री संघाच्या वतीने खासदार धैर्यशील माने यांच्याकडे शिष्टमंडळाद्वारे एका निवेदनाद्वारे केली आहे. हे निवेदन स्वीकारून खासदार धैर्यशील माने यांनी यासंदर्भात गृहमंत्री व रेल्वेमंत्री यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ अशी आश्वासन दिले. दिलेल्या निवेदनात, इचलकरंजी ते हातकणंगले मधील अंतर दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. हातकणंगले परिसरात टेक्स्टाइल पार्क आणि व्यवसायाचा मोठ्या प्रमाणात विकास होत आहे.

इचलकरंजी शहर परिसरातून मोठ्या प्रमाणात प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. त्यामुळे हातकलंगले रेल्वे स्टेशनचे हातकणंगले – इचलकरंजी रेल्वे स्टेशन असा नामविस्तार करावा. महानगरपालिकेचा दर्जा मिळाल्याने आणि मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढत असल्यामुळे भविष्यात रेल्वे स्टेशनला मोठ्या प्रमाणात प्रवासी सुविधा आणि सर्व गाडीला स्टोपेज मिळतील. हातकणंगले स्टेशनला कोल्हापूर-पुणे वंदे भारत ट्रेन चा स्टोपेज करावा, इचलकरंजीतून हातकणंगले रेल्वे स्टेशनला जाताना रस्त्यात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून सदरचा मार्ग अतिक्रमण मुक्त करून स्टेशनला जाण्यास मोठा आणि प्रशस्त मार्ग करावा. अशीही मागणी करण्यात आली.

नवीन सुविधा निर्माण करून दिल्यास हातकणंगले तालुक्यासह इचलकरंजीचा मोठा विकास होईल असे म्हटले आहे. खास. माने यांना भेटलेल्या शिष्टमंडळामध्ये अध्यक्ष अशोक बाहेती, सचिव विनोद कांकानी, उपाध्यक्ष रामस्वरूप पुरोहित, सहसचिव विजेंद्रसिंह राठोड, पवन बडीवाल, दामोदर धूत आदींचा समावेश होता.