एकीकडे लोकसभा निवडणुकीचा प्रचार स्वबळावर सुरू केला असताना दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीने माझ्या विरोधात उमेदवार उभा केला नाही तर त्याचे स्वागत करतो, असे म्हणत एका अर्थाने माविआ सोबतच्या सहकार्याचे एक पाऊल पुढे टाकले आहे.
त्यांच्या विरोधात शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांची लढत निश्चित मानली जात असताना भाजपच्या गोटातून जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक आमदार विनय कोरे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शौमिका महाडिक या उमेदवारांची नावे पर्याय म्हणून नव्याने पुढे येऊ लागली असल्याने या पातळीवरचा संभ्रम संपताना दिसत नाही.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची यावेळची लढत चुरशीची होणार हे दिसू लागले आहे. गेल्या लोकसभा निवडणूक शिवसेनेचे धैर्यशील माने यांनी प्रथमच निवडणूक रिंगणात उतरताना राजू शेट्टी यांच्याशी लढत दिली होती.
शेट्टी यांच्या संसद ते शिवार या प्रवासाची हॅट्रिक खंडित करीत माने प्रथमच संसदेत पोहोचले. आता या दोघांमध्येच पुन्हा लोकसभा निवडणुकीचे समर रंगणार हे बरेचसे स्पष्ट झाले आहे. मात्र अखेरच्या टप्प्यांमध्ये राजकीय पातळीवर काही महत्त्वाच्या घडामोडी घडत असून त्यामुळे रागरंग बदलण्याची चिन्हे आहेत.