मतदारांना स्लीप पोचविण्यासाठी शिक्षकांची अनोखी शक्कल!

यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी सोलापूर जिल्ह्यात ३६ लाख ५६ हजार ८०३ मतदार आहेत. त्या सर्वांना मतदार स्लीप देण्याची जबाबदारी अवघ्या तीन हजार ५९९ बीएलओंवर असून त्यातही सर्वाधिक बीएलओ जिल्हा परिषद शाळांचे शिक्षकच आहेत.त्यांच्यासमोर आता अवघ्या सहा दिवसांत सर्व मतदारांपर्यंत स्लीप पोच करण्याचे आव्हान आहे. त्यामुळे गावांचा आठवडी बाजार गाठून बीएलओ मतदारांना स्लिपा पोच करीत आहेत. मतदानाची घटलेली टक्केवारी वाढविण्यासाठी प्रशासनाने देखील विविध माध्यमातून प्रयत्न केले आहेत.

शालेय शिक्षण विभागाने प्रत्येक विद्यार्थ्याच्या माध्यमातून त्यांच्या पालकांनाही आवाहन करायला लावले आहे. मतदान साहित्य घेऊन केंद्रांवर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एसटी बसगाड्यांची सोय करण्यात आली आहे. पण, माळशिरस, बार्शी, सांगोला, मंगळवेढा, अक्कलकोट, करमाळा या दूरवरील तालुक्यातील अनेक कर्मचाऱ्यांना शेकडो किमीचा प्रवास करून दुसऱ्या तालुक्यात येऊन तेथून बसगाडीने मतदान केंद्रांवर जावे लागणार आहे.

त्या काहींनी पदरमोड करून त्याठिकाणी येवू शकत नसल्याचे जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले आहे. त्याअनुषंगाने बैठक पार पडली असून आता त्या दूरवरील कर्मचाऱ्यांना थेट मतदान केंद्रांवर नेण्यासाठी स्वतंत्र बसगाड्यांची सोय करण्यासंदर्भातील निर्णय उद्या (बुधवारी) होणार आहे.