सध्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार अगदी जोमाने सुरु असलेला पहायला मिळत आहे. मतदानासाठी अगदी काहीच दिवस शिल्लक राहिल्याने प्रचारात चढा ओढ पहायला मिळत आहे. हातकणंगले विधानसभा मतदारसंघात निर्णायक भूमिका बजावणाऱ्या हुपरी परिसरातील पहिल्या नवनिर्मित हुपरी नगरपरिषदेतील विरोधी पक्ष व सत्ताधाऱ्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
शेतकरी संघटनेचा एकला चलो नारा, राष्ट्रवादी, शिवसेना, आरपीआय, ताराराणी विकास आघाडी व मनसे महायुतीची बुलेट ट्रेन धावत आहे. तर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आता नाही तर कधीच नाही, असा पवित्रा घेतल्याने हातकणंगले लोकसभा मतदारसंघात निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. हुपरी परिसरातील गावांमध्ये प्रचार शिगेला पोहचलेला आहे. हुपरी परिसरातील भागात सर्वाधिक मतदान घेण्यासाठी स्थानिक नेत्यांबरोबरच पाठबळ देणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये इर्षा पहायला मिळते आहे. मतदारांच्या गाठीभेटीनंतर आता थेट जाहीर सभांनी जागा घेतली आहे.
१२ मे ला शेतकरी संघटनेच्या वतीने राजू शेट्टी यांनी चिटणीस चौकातील जाहीर सभेत हमीभावासह अनेक मुद्यांवर सभा गाजवली तर ३ तारखेला महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्यासाठी नितीन गडकरी यांची सभा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली आहे. तर महाविकास आघाडीची ४ एप्रिलला सभा घेण्यासाठी हालचाल सुरू केली आहे. विरोधी पक्षाचा पराभव कसा करायचा यासाठी खलबत्ते केली जात आहेत. यातून राजकीय संघर्षाची बीजे पेरली जात आहेत.