आटपाडी तालुक्यात संजय पाटील यांचा प्रचार दौरा

सध्या लोकसभा निवडणुकीच्या धामधुमित प्रत्येक पक्ष व्यस्त आहे. निवडणुकीस अगदी दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत त्यामुळे नेते मंडळींची खूपच धावपळ होत असल्याचे चित्र दिसत आहे. लोकसभा निवडणूक प्रचारार्थ आटपाडी तालुक्यात संजय पाटील यांचा प्रचार दौरा करण्यात आला.

यादरम्यान झरे येथील सभेत ते बोलत होते. संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ नेलकरंजी, करगणी, खरसुंडी, व शेटफळे, निंबवडे, राजेवाडी, दिघंची, झरे येथे नागरिक,कार्यकर्त्यांशी संवाद साधत मार्गदर्शन करण्यात आले. सांगली जिल्ह्यातील दुष्काळ कायमचा हटवण्यासाठी भारतीय जनता पार्टीने टेंभू ताकारी आणिम्हैसाळ या योजना पूर्णत्वास नेल्या आहेत, त्यामुळे जनता आमच्या पाठीशी आहे, असा विश्वास सांगली लोकसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार खासदार संजयकाका पाटील यांनी व्यक्त केला. संजयकाका पाटील म्हणाले, ज्यांच्या घरात १२ वेळा खासदारकी होती त्यांनी सांगली जिल्ह्यासाठी काय केलं हे त्यांना सांगता येत नाही. सत्तेत असतानाही आटपाडी, जत, खानापुर, कवठेमहांकाळ, तासगाव या तालुक्यांचा दुष्काळाचा
प्रश्न ते सोडवू शकले नाहीत.

भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हजारो कोटींच्या टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ या योजना पूर्णत्वास नेल्या. आज दुष्काळी तालुक्यामध्ये सगळीकडे पाणी आले आहे. शेतकऱ्यांची शिवार हिरवीगार झाली आहेत. हरितक्रांती झाली आहे. येणाऱ्या काळात राहिलेल्या वंचित सर्व गावांमध्ये या सर्व योजनांचे पाणी नेले जाईल. कोणतेही गाव पाण्यापासून वंचित राहणार नाही. यासाठी आम्ही जिवाचे रान करू. दुष्काळाचा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी आपण सर्वांनी भारतीय जनता पार्टीला साथ द्यावी, असे आवाहन संजयकाका पाटील यांनी केले.