इचलकरंजी शहरात बुधवारी साजऱ्या होणाऱ्या शिवजयंती सोहळ्यासाठी विविध सामाजिक आणि सांस्कृतिक मंडळांतर्फे जय्यत तयारी करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमापूजन आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमाच्या सादरीकरणासाठी चौकाचौकांत व्यासपीठांची बांधणी सुरू आहे. शहराच्या मध्यवर्ती भागासह वाढीव भागात चौकांभोवतालचे रस्तेदेखील भगवेमय होऊ लागले आहेत. बाजारपेठेत भगव्या पताका व झेंड्यांमुळे वातावरण शिवमय झाले आहे. शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ सिंहासनारूढ, लढाऊरूप, तसेच बालशिवाजी रूपातील पुतळ्यांच्या खरेदीला गर्दी वाढू लागली आहे.
मुख्य मार्गावर बाजारपेठेत भगव्या पताका विक्रीसाठी मांडण्यात आल्या आहेत. तसेच झेंडे, टी शर्टना मागणी वाढली आहे. शिवजयंती मिरवणुकीस सहभागी होण्यासाठी शिवाजी महाराज, शहाजीराजे, जिजाऊ, बालशिवाजी, मावळे यांच्या वेशभूषा खरेदीसाठी ड्रेपरी व्यावसायिकांकडे बुकिंग करण्यास सुरुवात झाली आहे. तसेच चंद्रकोर, कानातले डूल यांनाही मागणी वाढली आहे. शिवभक्तांकडून फेट्यांना मागणी वाढली आहे. हार-फुलांचेही बुकिंग झाले आहे. भगवे झेंडे बाजारपेठेत आकर्षणाचे केंद्र बनले आहेत.
झेंड्यांबरोबर शिवमुद्रा, शिवप्रतिमा स्टेज सजावटीचे साहित्य, पताका आदी वस्तूंना चांगली मागणी आहे. सजावटीच्या साहित्याच्या दरांमध्ये काही प्रमाणात वाढ झाली आहे. शिवविचारांचा प्रचार आणि प्रसार व्हावा, या हेतूने विविध सामाजिक संघटनांतर्फे सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये व्याख्याने चर्चासत्रे, रक्तदान शिबिरे, स्पर्धा आदी उपक्रम साजरे होणार आहेत. या उपक्रमांमध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.