पुण्यातील ७४ वर्षीय आजोबांना कॉल गर्लची भेट घेणे चांगलंच महागात पडलं आहे. कॉल गर्लच्या भेटीमुळे आजोबांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे. एका चुकीमुळे आजोबांना आर्थिक आणि मानसिक मनस्ताप सहन करावा लागला आहे.
मात्र अखेर आजोबांना पोलिसांत धाव घेतली आणि यातून आपली सुटका करुन घेतली आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका महिलेसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून २ जणांना अटक केली आहे. ज्योती बनसोडे आणि रामचंद्र बापू कोरडे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणेकर आजोबांनी काही महिन्यांपूर्वी एका कॉल गर्लची भेट घेतली होती. त्यानंतर फसवणुकीच्या गुन्ह्यात अडकवू अशी धमकी देत आरोपींनी ३ महिन्यात आजोबांकडून ३० लाख रुपये उकळले. प्रतिष्ठा जाईल या भीतीने आजोबांनी देखील पैसे दिले. पुण्यातील मार्केटयार्ड परिसरातून हा प्रकार समोर आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीने जुलैमध्ये ज्योतीमार्फत एका कॉल गर्लची भेट घेतली होती. त्यानंतर फिर्यादी यांना ज्योतीचा फोन आला. तिने सांगितलं की पोलिसांनी त्या कॉल गर्लला मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात अटक केली. तिच्या मोबाईलमध्ये तुमचं कॉल रेकॉर्डिंग आहे, अशी ज्योतीने बतावणी केली. पोलिस या गुन्ह्यात तुमचेही नाव टाकतील, अशी भीती दाखवून हा विषय संपवण्यासाठी ज्योतीने पैशांची मागणी केली.
आपली प्रतिष्ठा जाईल या भीतीने ज्येष्ठ नागरिकाने आरोपींना रोख आणि धनादेशाद्वारे वेळोवेळी ३० लाख ३० हजार रुपये दिले. परंतु आरोपींचे दरमहा एक लाख रुपये न दिल्यास पोलिस कारवाई करतील, अशी धमकी दिली. अखेर सततच्या त्रासाला कंटाळून आजोबांनी पोलीस ठाणे गाठले. पोलिसांना याबाबत कारवाई केली असून पुढील तपास सुरु आहे.