ओरिसा राज्यातून विक्रीसाठी कोल्हापुरात आणला जाणारा १४ किलो गांजा स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने पकडला. इचलकरंजी रोडवरील पंचगंगा कारखान्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोघांना सापळा रचून ताब्यात घेण्यात आले.
नाथा पुषा माझी (वय ३३), पिन्युएल डॅनियल रैत (वय १९, दोघे रा. दोघे सिकाबाडी, संबलपूर, ओरिसा) अशी संशयितांची नावे आहेत. जप्त केलेल्या गांजाची किंमत तीन लाख पाच हजार रुपये आहे. जिल्ह्यात गांजा विक्रीच्या प्रकारात मोठी वाढ झाली आहे. मिरज, सांगली, आटपाटी, सीमाभागातून येणाऱ्या गांजावर कारवाई करण्यात आली होती.
परंतु बाहेरील राज्यातूनही गांजा येत असल्याचे तपासात समोर आले होते. विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनीही मागील आठवड्यात बैठक घेऊन अमली पदार्थांचे रॅकेट समूळ नष्ट करण्याच्या सूचना केल्या होत्या. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना परजिल्ह्यातून गांजा विक्रीसाठी आणला जात असल्याची माहिती मिळाली होती.
त्यांच्या पथकातील अंमलदार कृष्णात पिंगळे व अशोक पोवार यांनी कबनूर परिसरात सापळा रचला होता. मंगळवारी (ता.३) सायंकाळी कबनूर ते पंचगंगा कारखान्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोघा तरुणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.
त्यांच्याजवळील बॅग पोलिसांनी तपासल्या असता, १४ किलो गांजा मिळून आला. या कारवाईत उपनिरीक्षक जालिंदर जाधव, प्रकाश पाटील, सागर चौगले, अमित सर्जे, राजेश राठोड, महेश पाटील, राजू येडगे यांनी सहभाग घेतला.