इचलकरंजी शहर परिसरात…..

इचलकरंजी शहर परिसरात दिवसेंदिवस लहान मोठे उद्योग वाढू लागले आहेत. अनेकजण कमी वेळेत जास्त पैसा कसा मिळवता येईल यासाठी युवा वर्ग गुन्हेगारीत गुरफटला आहे. अनेकवेळेला वादावादी, हाणामारी, खंडणी वसूलीचे प्रकार होतात.
तारदाळ, खोतवाडी परिसरात महिन्याकाठी एखादा खून, हाफमर्डर हे नित्याचेच प्रकार झाले आहेत. वाढीव वस्ती परिसरात दारू अड्डे, अनेक अवैध धंदे यामुळे युवकांची व्यसनाधिनता, चैनीची प्रवृत्ती, यामुळे युवा पिढी वेगळ्या वळणावर चालल्याचे चित्र दिसत आहे.

अनेक वाढीव वसाहतीमध्ये बंद असलेली घरे फोडणे, चोरी करणे यामध्ये बाहेर लावलेल्या मोटारसायकली अगर जीवनावश्यक वस्तू लंपास करणे आणि यातून चैनी करणे असा प्रकार या परिसरात दिसत आहे. तारदाळ परिसरात अनेक ठिकाणी जुन्या मोकळ्या जागेत राजरोसपणे जुगार अड्डे चालविले जात आहेत. त्यामुळे युवा पिढीपुढे अवैध धंदे करण्याची सवयच लागत आहे. यामध्ये अनेक युवक व्यसनाधिनतेपायी कोणत्याही थराला जावू शकतात.

यातून खून, मारामारी, बलात्कार, चोरीचे प्रकार, लुटमार असे अनेक गुन्हे घडत आहेत. सामान्य माणूस या गुन्हेगारांच्या भीतीपोटी दचकून असतो. परिणामी तो फिर्याद देण्यासाठी पोलिस ठाण्यात धजावत नाही. याचा फायदा घेत अनेक टोळ्या तारदाळ, खोतवाडी परिसरात कार्यरत आहेत. तारदाळ खोतवाडीसारख्या ग्रामीण भागातही राजरोसपणे गुन्हेगारी डोकेवर काढत आहे. यावर वेळीच अंकूश ठेवायला हवा अन्यथा हा भाग बिहार होण्यासाठी वेळ लागणार नाही, अशी चर्चा जाणकार वर्गातून होत आहे.