वंदे भारत एक्सप्रेसला हातकणंगलेत थांबा करण्याच्या मागणीचे आमदार राहुल आवाडे यांच्याकडे निवेदन

वाहतुकीबाबतीत सर्व सामान्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. या अडचणी दूर करण्याचा नेतेमंडळींकडून पुरेपूर प्रयत्न देखील केला जातो. सध्या अशाच एका वाहतुकीच्या प्रश्नाबाबतीत आमदार राहुल आवाडे यांना विविध मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले. कोल्हापूर-पुणे वंदे भारत (ट्रेन नंबर २०६७३/२०६७४) ट्रेन ला हातकणंगले स्टेशनवर स्टॉपेज (थांबा ) देण्याची मागणी इचलकरंजी रेल्वे कृती समितीच्यावतीने पुणे येथे रेल्वे बोर्डचे डिव्हिजनल मॅनेजर राजेश वर्मा यांच्याकडे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की, कोल्हापूर- पुणे, वंदे भारत रेल्वेला हातकणगलेला स्टॉपेज (थांबा) दिल्यावर इचलकरंजी शहर परिसरातील पुणे व मुंबई जाण्यासाठी सोयीस्कर होणार आहे.

तसेच रेल्वेचे उत्पन्न सुद्धा वाढणार आहे. वंदे भारत ट्रेनमुळे मिरज, सांगलीला जाण्याचा प्रवाशांचा खर्च आणि वेळही वाचणार आहे. दरम्यान, इचलकरंजी रेल्वेसाठी निधी उपलब्ध करण्यासाठी रेल्वे कृती समितीचे शिष्टमंडळ आमदार राहुल आवाडे यांची भेट घेऊन आपल्या मागण्या सविस्तर निवेदित
करण्यात आल्या. शिष्टमंडळात अध्यक्ष गुरुनाथ म्हातुकडे, नंदू बांगड, महेंद्र जाधव, बालकृष्ण  तोतला, दीपक पंडित, बाळासाहेब नरशेड़ी, धर्मराज जाधव, रमेश शर्मा, पांडुरंग पिसे, अशोक पाटणी, अजय दायमा आदींचा समावेश होता. 

दरम्यान, दिल्लीला जाणारी गोवा एक्सप्रेस सुद्धा पूर्ववत चालू ठेवावी, बिकानेर- मिरज रेल्वेला कोल्हापूरपर्यंत वाढवून आठवड्यात तीन दिवस सुरू करावी आणि उत्तर तथा दक्षिण भारतात जाण्यासाठी कोल्हापूर, सांगली परिसरातून नवीन गाडी सुरू करण्याबाबत रेल्वेमंत्री आणि रेल्वे बोर्ड मुंबई येथे संपर्क करून प्रयत्न सुरू असल्याची माहिती रेल्वे प्रवासी समितीचे सदस्य अशोक बाहेती यांनी दिली आहे.