आगामी सहा महिन्यांत होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाने आपला विचार करावा, असा आग्रह इचलकरंजी मतदारसंघातील भाजपाचे सहयोगी सदस्य आमदार प्रकाश आवाडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धरला.
त्यासंदर्भात काही आश्वासन मिळाल्यानंतरच आवाडे यांनी सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून लोकसभा निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतल्याचे जबाबदार सूत्रांकडून सांगण्यात आले.
तिथे भाजपाचे सुरेश हाळवणकर आणि आवाडे यांच्यात विधानसभेच्या उमेदवारीवरून जोरदार रस्सीखेच होणार आहे. त्याचे पडसाद लोकसभा निवडणुकीत उमटले आहेत. आमदार आवाडे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत रविवारी रात्री झालेल्या चर्चेत भाजपाचे माजी आमदार हाळवणकर यांच्याबद्दल तक्रारी केल्याचे समजते. त्यांचा माझ्या प्रत्येक कामात हस्तक्षेप होत आहे.
अशा स्थितीत सहा महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीत आपण आम्हाला कोणते संरक्षण देणार आहात, अशीही विचारणा आवाडे यांनी केली. त्यासंदर्भात काही ठोस शब्द घेतल्यानंतरच आवाडे यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी कोल्हापुरातील निवासस्थानी अर्धा तास चर्चा केल्यानंतर शिंदेसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या मिरवणुकीत ते सहभागी झाले.