सांगोल्यात वडिलांच्या अंत्यसंस्कारानंतर थेट गाठले मतदान केंद्र

काल लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान झाले. मतदानाच्या टक्केवारीमध्ये सातत्याने घट होताना पाहायला मिळत आहे. मात्र मेथवडे (ता. सांगोला) येथील शेळके कुटुंब याला अपवाद ठरले आहे. वडिलांच्या निधनानंतर या कुटुंबातील मुलांनी मतदान केंद्रावर जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावत आदर्श मतदार असल्याचे दाखवून दिले.

मेथवडे येथील जयवंत शेळके (वय ९४) यांचे मतदानादिवशी म्हणजे मंगळवारी (ता. ७) सकाळी आकरा वाजता निधन झाले. त्यानंतर वडिलांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करून त्यांची दोन्ही मुले कैलास व अतुल यांनी थेट मतदान केंद्र गाठत आपला मतदानाचा पवित्र अधिकार बजावला. कुटुंबातील सदस्याचे निधन झाल्यावर १३ दिवस दुखवटा पाळला जातो.