देशभरात लोकसभा निवडणुकीचे तीन टप्पे झाले आहेत. आता चौथ्या टप्प्याची तयारी सुरु आहे. प्रचार जोरात सुरु आहे. निवडणुकीचा चौथा टप्पा आता १३ मे रोजी होणार आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे. परंतु आतापासून गुलाल उधळाला जात आहे. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील महायुतीच्या मेळाव्यात मंत्री अनिल पाटील यांनी महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्या विजयाचा गुलाल उधळला. त्याची चांगलीच चर्चा रंगली.जळगाव लोकसभेच्या महायुतीचे उमेदवार स्मिता वाघ यांच्या प्रचारार्थ अमळनेरमध्ये मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्यात मंत्री अनिल पाटील यांनी आतापासूनच स्मिता वाघ हे विजयी झाल्याचे जाहीर करत मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन यांना विजयाचा गुलालाचा टिळा लावला. मेळाव्याचा समारोप झाल्यानंतर मंत्री अनिल पाटील व मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील यांनी एकमेकांना गुलाल लावला.जळगाव लोकसभा मतदार संघात महायुतीकडून स्मिता वाघ उमेदवार आहेत.
महाविकास आघाडीकडून करण पवार निवडणूक रिंगणात आहे. दुरंगी होणाऱ्या या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या मतदार संघात १३ मे रोजी मतदान होणार आहे. मतदानाला अवघे चार दिवस शिल्लक असतानाचा मंत्र्यांकडून स्मिता वाघ यांच्या विजयाचा गुलाल उधळला गेला.