नव्या वर्षात पुन्हा एकदा महागाईचा भडका उडणार आहे. देशातील आघाडीच्या एफएमसीजी कंपन्या हिंदुस्थान युनिलिव्हर, गोदरेज कंझ्युमर, डाबर, टाटा कंझ्युमर, पार्ले प्रॉडक्ट्स, विप्रो कंझ्युमर, मॅरिको, नेस्ले आणि अदानी विल्मर या कंपन्यांनी उत्पादन वाढ आणि कस्टम डय़ुटीची भरपाई करण्यासाठी वस्तूंच्या किमती वाढवण्यास सुरुवात केली आहे.
कंपन्यांच्या या निर्णयामुळे नवीन वर्षात चहा पावडर, तेल, साबणपासून क्रीमपर्यंतच्या किमतीत 5 ते 20 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. मागील 12 महिन्यांतील किमतींपैकी ही सर्वात मोठी वाढ असेल. या वर्षी सप्टेंबर महिन्यात खाद्य तेलाच्या आयातीवरील शुल्कात 22 टक्के वाढ झाली असून संपूर्ण वर्षभरात त्यात 40 टक्के वाढ झाली आहे.
गेल्या वर्षी म्हणजे 2023 मध्ये साखर, गव्हाचे पीठ आणि कॉफी यांसारख्या अनेक वस्तूंच्या उत्पादन खर्चात वाढ झाली होती. एक वर्षानंतर भाव वाढवले जाणार आहेत. याचा उत्पादनांच्या मागणीवर परिणाम होणार नाही, अशी आम्हाला आशा आहे. तसेच, पार्ले आपल्या सर्व उत्पादनांचे पॅकेजिंग वाढीव किमतीसह छापण्यास तयार आहे, असे मयंक शाह म्हणाले. ग्रामीण भागांमध्ये वाढत्या मागणीमुळे ऑक्टोबरमध्ये देशातील एफएमसीजी उद्योगात वर्षाला 4.3 टक्क्यांची वाढ झाली, तर नोव्हेंबरमध्ये विक्री कमी झाल्यामुळे 4.8 टक्क्यांची घसरण झाली.
हिंदुस्थान युनिलिव्हरनेही साबण आणि चहाच्या किमती वाढवल्या आहेत. डाबरने हेल्थ केअर आणि ओरल केअर उत्पादनांच्या किमतीही वाढवल्या आहेत, तर नेस्लेने कॉफीच्या किमतीत वाढ केली आहे. सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या वस्तूंच्या किमती वाढल्याचा लोकांना फारसा फटका बसू नये यासाठी कंपनीने काही निवडक श्रेणींमध्ये किमती वाढवल्या आहेत, असे डाबरचे मुख्य आर्थिक अधिकारी अंकुश जैन यांनी सांगितले. कंपनीचे म्हणणे आहे की, या वाढलेल्या किमतीचा पुढील दोन तिमाहीत शहरी मागणीवर कोणताही विशेष परिणाम होणार नाही आणि ग्राहकांना हे जास्त परवडेल.