वस्त्रनगरी म्हणून इचलकरंजीचे नाव जगजाहीर आहे. या ठिकाणी यंत्रमाग उद्योग भरपूर प्रमाणात आहेत. अनेक परदेशी लोक कामासाठी येथे वास्तव्यास आहेत. पण अलीकडच्या काळात यंत्रमागधारकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
इचलकरंजी शहरापाठोपाठ शिरदवाड, अब्दुललाट, कुरूंदवाड या ठिकाणी यंत्रमागाची संख्या मोठी आहे. मात्र, सध्या कापडाला अपेक्षित दर नसल्याने आणि मागणी घटल्याने एकच शिफ्ट सुरु ठेवून यंत्रमागधारक आर्थिक नुकसान सोसत आहेत.
शेतीपाठोपाठ सर्वाधिक रोजगार देणारा उद्योग म्हणून यंत्रमाग उद्योगाकडे पाहिले जाते. मात्र, सध्या या उद्योगात कमालीचे अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सुताचे वारंवार बदलणारे दर, कापडाची घटलेली मागणी यामुळे एकच शिफ्ट सुरु ठेवण्याची वेळ यंत्रमागधारकांवर आली आहे. हा उद्योग वेळीच स्थिर न झाल्यास अनेकांवर बेकारीची कुन्हाड कोसळण्याचा धोका वाढला आहे.