बुबनाळ (ता. शिरोळ) येथे कारवरील ताबा सुटल्याने ती पुलावरून थेट खाली कोसळली. या भीषण अपघातात एक युवक जागीच ठार झाला. सौरभ राजू चव्हाण (वय २५, रा. आसरा नगर, गल्ली नं. १, इचलकरंजी, ता.हातकणंगले) असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. कारमधील दोघेजण जखमी आहेत. हा अपघात दुपारी साडेचारच्या सुमारास घडला.
जखमींवर इचलकरंजी येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.सौरभ चव्हाण हा आपल्या दोन मित्रांबरोबर कार क्र(एम.एच ०९ एफ.बी.६९९३) मधून कवठेगुलंदहुन औरवाडच्या दिशेने येत होता. बुबनाळ हद्दीतील हॉटेल सीजन फॉरच्या लगत असणाऱ्या साकव पुलाजवळ त्याचा कारवरील ताबा सुटल्याने कार थेट पुलावरून खाली कोसळली.
हा अपघात इतका भीषण होता की, कार पलटी होऊन पुलाखाली कोसळ्याने कारचालकाचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले.