आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 58 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पंजाब किंग्सवर 60 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला. आरसीबीने पंजाबला विजयासाठी 242 धावांचं आव्हान दिलं होतं.मात्र आरसीबीसमोर पंजाबला 20 ओव्हरही नीट खेळता आलं नाही.
आरसीबीच्या गोलंदाजांनी पंजाबला 17 ओव्हरमध्ये 181 धावांवर गुंडाळलं. आरसीबीचा हा सलग चौथा विजय ठरला. आरसीबीने या विजयासह प्लेऑफमधील जर तरचं आव्हान कायम राखलं. तर पंजाब या पराभवासह स्पर्धेतून बाहेर पडली. पंजाब मुंबईनंतर स्पर्धेतून बाहेर पडणारी दुसरी टीम ठरली आहे.
तर आता 4 जागांसाठी 8 संघांमध्ये चुरस असणार आहे.आरसीबी पाचव्या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये सातव्या स्थानी आहे. आरसीबीच्या नावावर आता 12 सामन्यातील 5 विजयासह 10 गुण आहेत. आरसीबीचा नेट रनरेट हा 0.217 इतका आहे. तर पहिल्या स्थानी कोलकाता नाईट रायडर्स विराजमान आहे. केकेआरने 11 पैकी 8 सामने जिंकलेत.
केकेआर 16 पॉइंट्स आणि 1.453 नेट रनरेटसह नंबर 1 आहे. तर राजस्थान रॉयल्सनेही 11 पैकी 8 सामने जिंकलेत. मात्र नेट रनरेटमुळे राजस्थान दुसऱ्या स्थानी आहे. हैदराबाद 7 विजयांसह तिसऱ्या स्थानी आहे. तर चेन्नई 6 विजयांसह चौथ्या क्रमांकावर आहे.