१०वी आणि १२वीचा निकाल……..

दहावी आणि बारावीच्या निकालाचे काम अंतिम टप्प्यात आहे. राज्यातील ९ विभागीय मंडळांतील २ कोटी ३० लाख उत्तरपत्रिका तपासणीचे काम पूर्ण झाले आहे. उत्तरपत्रिका स्कॅनिंगची प्रक्रिया पूर्ण झाली असून, २३ प्रकारचे रिपोर्ट तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.उत्तरपत्रिका तपासणीसाठी राज्य मंडळाच्या दहा हजार कर्मचाऱ्यांनी जिल्हानिहाय उत्तरपत्रिकांचे संकलन केल्याने यंदा पहिल्यांदाच दोन्ही परीक्षांचे निकाल मे महिन्यात जाहीर होत आहेत.

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या सर्वच उत्तरपत्रिका तपासणीचे काम पूर्ण झाले आहे.गेल्यावर्षी दहावीचा निकाल २ जून रोजी आणि बारावीचा निकाल २५ मे रोजी जाहीर केला होता. यावर्षी बारावीचा निकाल २० ते २५ मे आणि दहावीचा निकाल २७ ते ३० मे च्या दरम्यान जाहीर होत आहे.यापूर्वीच्या परीक्षांत दहावी आणि बारावीच्या उत्तरपत्रिका परीक्षक ते नियामकांकडून तपासणी होऊन प्रत्येक विभागीय मंडळाकडे येण्यासाठी २१ दिवस लागत होते.

यावर्षी मंडळाने प्रत्येक जिल्हानिहाय आणि तालुका केंद्रावर उत्तरपत्रिका संकलन केंद्रे वाढवली. काही ठिकाणी स्वतः जाऊन उत्तरपत्रिका ताब्यात घेतल्या.