डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य घरकुल योजनेचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी राज्य शासनाकडे 

इचलकरंजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य घरकुल योजनेचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी नगरविकास विभागाचे उपसचिव जवळीकर यांच्याकडे आमदार डॉ. राहुल आवाडे व माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांनी सादर केला आहे. महापालिका सफाई कामगार म्हणून २५ वर्षे काम बजावलेल्या लाभार्थ्यांना स्वतःचे हक्काचे घर देण्याची शासनाची ही योजना आहे. लवकरच याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्षात कामाला प्रारंभ होणार असल्याची माहिती माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांनी दिली.

 रजपुते म्हणाले, महापालिकेत २५ वर्ष सफाई कामगार म्हणून कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यास स्वतःच्या हक्काचे घर देण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य घरकुल योजना राबवली जाते. याबाबत इचलकरंजी महापालिकेने सांगलीच्या पिनाका कन्सल्टन्सी कंपनीस या योजनेच्या प्रकल्प आराखड्याचे काम दिले होते. त्यांनी आराखडा दिला आहे. त्यानुसार भाग्यरेखा चित्रमंदिर जवळ कामगार चाळ येथे तीन मजली इमारत उभारण्यात येणार आहे. त्यात पहिल्या टप्प्यात २४० लाभार्थ्यांना स्वतःची घरे दिली जाणार आहेत. त्यासाठी ७४ कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित आहे. शहरातील महापालिका कामगार संघटनांनीही याच पद्धतीने पाठपुरावा केला. आमदार डॉ. राहुल आवाडे यांनी याबाबत सकारात्मक पाऊल उचलले आहे. त्यांच्यासह आयुक्त पल्लवी पाटील आणि अन्य संबंधित खात्याच्या अधिकारी यांच्या संयुक्त बैठका या प्रकल्पाबाबत झाल्या आहेत. या प्रस्तावास लवकरच मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर प्रत्यक्ष कामास प्रारंभ होणार आहे. या प्रकल्पाचे काम तात्काळ सुरू केले जावे यासाठी महापालिका आणि शासनाकडे पाठपुरावा करणार आहोत, असेही रजपूते यांनी स्पष्ट केले.